मावळ : टाकवे बुद्रुक गावातील वाघमारे वस्ती परिसरात दहा दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरांचा शोध घेण्यात पोलिस गर्क असतानाच चोरटयांनी पुन्हा दोन घरामध्ये चोरी करत पोलिसांना बुचकाळ्यात टाकले आहे.
गावातील रहिवाशी दिनेश असवले आणि त्यांचे शेजारी हे आपल्या कुटुंबासोबत लग्नानिमित्त बाहेर गेले. चोरटयांनी ही संधी साधून या दोन्ही घरांना आपले लक्ष्य केले. चोरटयांनी दिनेश असवले यांच्या घरातील २५ तोळे सोने आणि सत्तर हजारांची रोख रक्कम लंपास केली. तर, दुसऱ्या घरातील दोन तोळे सोने लांबविले.
दिनेश असवले यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरटयांनी ही चोरी केली. लग्न कार्य उरकून ते घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने मावळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या घटनेबाबत पुढील तपास वडगाव मावळ तपास करत आहेत.