रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सन २००० मध्ये यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव राज्यातील पहिले 'पिंक' व्हिलेज ठरले होते. त्यानंतर राज्यातील हजारभर गावे ''पिंक'' झाली. याच धर्तीवर आता आणखी एक गाव नव्हे तर पूर्ण शहर 'यलो सिटी' म्हणून नावाजलं जाणार आहे.
सांगली जिल्ह्यात हळद, ऊस, डाळिंब, द्राक्ष ही प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हळदीला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. हळदीचा वायदे बाजार सांगलीतून सुरू झाला. सांगली ही देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे.
सांगलीच्या हळदीचा पिवळ्या रंग अतिशय उच्च आहे. हळदीच्या उच्चतम गुणवत्तेमुळे सांगलीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. याच पिवळ्या धम्मक हळदीवरून सांगली शहर 'यलो सिटी' ब्रँडिंग करण्याचे निश्चित करण्यात आलेय.
सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची ही संकल्पना आहे. हळदीचा पिवळा रंग यावरून सांगली महापालिकेच्या इमारतींपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे. सांगलीमध्ये यापुढे बांधली जाणारी कोणतीही इमारत असो वा शासकीय कार्यालय ती पिवळ्या रंगातच होईल. नागरिकांनीही नवीन इमारत बांधताना या संकेताचे पालन करावे, अशी अपेक्षा आयुक्त यांनी व्यक्त केली आहे.