मुंबई : लालबागमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव असलेल्या 'लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळा'चा यंदाचा ९० वा गणेशोत्सव सोहळा आहे. इथली उत्सव मुर्ती आणि देखावा हा लाखो गणेशभक्तांमध्ये दरवर्षी औत्सुक्याचा विषय असतो.
उंच गणेशमुर्ती आणि ऐतिहासिक स्थळांची हुबेहुब प्रतिकृती पाहण्यासाठी लालबागमध्ये दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन, आकर्षक सजावट करण्याचे आव्हान मंडळासमोर असते.
यावर्षी ९० व्या वर्षात मंडळाने तामिळनाडू, वेल्लो येथील सुप्रसिद्ध श्रीपुरम सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ज्येष्ठ कलादिग्दर्शक अमोल विधाते यांनी ही प्रतिकृती साकारली आहे.
४० फूट उंच आणि ६० फूट रुंद एवढ्या जागेत हे 'सुवर्णमंदिर' आपल्याला पाहायला मिळणार आहे.
इको फ्रेंडली गणेशोत्सवाला प्रोत्साहन देत आम्ही यंदा साकारलेल्या प्रतिकृतीतही पीओपीचा वापर कमीत कमी करुन त्याजागी जास्तीत जास्त फायबरचा उपयोग केला असल्याचे उत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी 24taas.com ला सांगितले.
समाजातील वेगवेगळ्या घटकांना सोबत आणण्याचा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा प्रयत्न राहिला आहे. दिवसभर कष्ट करुन नागरिकांना सेवा देणाऱ्या घटकांना या मानाच्या मुर्तीसमोर आरती धरण्याचा मान मिळत असतो.
यंदा यामध्ये पहिल्या दिवशी सायन रुग्णालयातील नर्सेस आणि सहकारी, दुसऱ्या दिवशी गॅस वितरक, तिसऱ्या दिवशी सेवेची ठायी तत्पर-सामाजिक संस्था, चौथा दिवस उत्सव मंडळाकरिता, पाचवा दिवस बॅंक कर्मचारी, सहावा दिवस उत्सव मंडळातील मान्यवरांना मिळणार आहे.
सातवा दिवस बॅक स्टेज आर्टिस्ट, आठवा दिवस रेल्वे सिग्नल यंत्रणा, नवव्या दिवस उत्सव मंडळातील मान्यवर, दहावा दिवस मुंबई पोलीस तर अकराव्या दिवशी उत्सव मंडळाला हा मान मिळणार आहे.