टोमॅटो बाजारात पोहोचण्याआधीच शेतात लाल चिखल

टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल

Updated: Aug 12, 2019, 07:03 PM IST
टोमॅटो बाजारात पोहोचण्याआधीच शेतात लाल चिखल title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव-पुणे : आधीचा दुष्काळ आणि आता सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटो बाजारात पोहोचण्याआधीच शेतात लाल चिखल झाला आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधली टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. जुन्नर, शिरूर, आंबेगाव हे तालुके टोमॅटो उत्पादनात अग्रेसर तालुके म्हणून ओळखले जातात. या ठिकाणची नारायणगाव बाजारपेठ ही टोमॅटो विक्रीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. इथला टोमॅटो जगभरात पाठवला जातो. मात्र सध्या पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकण्याआधीच सडले आहेत. टोमॅटोच्या फुगवणीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. मात्र ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने टोमॅटोचे अशाप्रकारे नुकसान झालं आहे.

एक एकर टोमॅटो पिकवण्यासाठी शेती मशागत, ठिबक, मल्चिंग, लागवड, फवारणी या सगळ्यासाठी एक ते सव्वा लाखांचा खर्च येतो. मात्र टोमॅटो उत्पादकांचा हा सगळा खर्च पाण्यात गेला आहे.

पोटच्या लेकरासारखं संगोपन केलेलं पीक सडून गेल्यानं टोमॅटो उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे जगावं तरी कसं असा प्रश्न इथल्या बळीराजाला पडला आहे.