नितेश महाजन / जालना : Two Talathi were caught taking a bribe : भ्रष्ट्राचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे एक प्रकरण पुढे आले आहे. लाच घेण्यासाठी चक्क डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात आले. पे अॅपच्या माध्यमातून पैसे दोन लठाण्यांनी घेतले आणि ते चांगलेच फसलेत. फोन पे वरुन दोन तलाठ्यांनी 17 हजारांची लाच घेतली आणि ते लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेत.
मंठा तालुक्यातील दोन तलाठ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले गेले. जालना जिल्ह्यात वाळूची पकडलेली 6 चाकी गाडी सोडण्यासाठी दोन तलाठ्यांना फोन पे वरुन 17 हजारांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलीय. मंठा तालुक्यातील उमखेड येथील अक्षय भुरेवाल आणि मंगरुळ येथील मंगेश लोखंडे अशी या लाचखोर आरोपी तलाठ्यांची नावं आहेत.
तक्रारदारांची वाळूची गाडी या तलाठ्यांच्या पथकांनी पकडली होती. यावेळी तक्रारदारांनी रॉयल्टीची रितसर पावती तलाठ्यांना दाखवली. मात्र या पावतीत खाडाखोड आहे, ही पावती चालणार नाही, असं सांगत तुझ्यावर कारवाई करावी लागेल. अन्यथा 50 हजार रुपये दे, असं म्हणत तलाठ्यांनी गाडीच्या मालकांकडे लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती हे प्रकरण 30 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांना लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केली. अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानंतर दोन तलाठ्यांना 17 हजार रुपये फोन पेवर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन मंठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.