बदलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा कोकणाला उद्धवस्त करणारा प्रकल्प आहे. ज्या कोकण पट्ट्याने शिवसेनेला २४ आमदार देऊन ताकद दिली त्या कोकणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकत्ते उद्धवस्त करायला निघाले आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
काल उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे हा आमचा विजय असून आम्ही नाणारमध्ये सभा घेतली. याचा परिणाम दिसून येत आहे. आज उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांची भेट झाली, असे नितेश राणे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची दखल उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेते हे दाखवणारी आजची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट आहे, असा चिमटा ही राणे काढला. सेनेला जर खरंच या रिफायनरीला विरोध करायचा असेल तर मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात ग्रीन रिफायनरी आणि सरकार यांच्यात होणारा करार रद्द करून दाखवा,असे आव्हान राणे यांनी सेनेला दिलेय.
तसेच उद्धव यांना आपल्या उद्योग मंत्र्यांचा ग्रीन रिफायनरी सोबतचा या कराराबाबत माहीत नाही का, असा सवाल करत हे सर्व कोकणी जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे, अशी टीका राणे यांनी केली. ते मराठा मोहोत्सवासाठी बदलपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.