उस्मानाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. काही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे, हा थिल्लरपणा आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर उस्मानाबाद दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला. थिल्लर गोष्टींकडे पाहायला मला वेळच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात विविध भागात परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, पंचनामे होत आले आहेत, लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आज दिले. लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, मी दिलासा द्यायला आलोय आधार द्यायला आलोय असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा करणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगावमधील पूरग्रस्तांना धीर दिला. काळजी करु नका हे तुमचे सरकार आहे. मदतीचे वचन देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस यांनी केलेल्या टीकेकडे कसं बघता. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, याकडे बघायला मला वेळच नाही. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझे लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही.