मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवतोय. नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, सोलापूर, बीडमध्ये लसींचा तुटवडा आहे. तसंच नवी मुंबई, वसई-विरार, नालासोपारा, कल्याण-डोंबिवलीत लस नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
कोल्हापूरात लस उपलब्ध नसल्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातल्या सर्वच केंद्रांबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय. ज्यांना दुसरा डोस घेण्यासंदर्भात मेसेज आले ते लोक केंद्रांकडे धाव घेतात. पण फक्त त्यांची नाव नोंदवून त्यांना घरी पाठवलं जातय. कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करतायत.
औरंगाबादेमध्येही गेल्या 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे. फक्त 300 लसी उपलब्ध आहेत. पण लसीकरणासाठी मोठी गर्दी होतेय. केंद्रावर येऊनही लस मिळणार नसल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतायत.
सोलापूर शहर तसंच जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रं बंद आहेत. पुणे आरोग्य उपसंचालकांकडून 24 जूनला 20 हजार डोसचा पुरवठा झाला. मात्र हा पुरवठा 25 जूनलाच संपला.
अमरावती जिल्ह्यात बहुतांश लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नाहीय. महापालिका क्षेत्रात 17 लसीकरण केंद्र आहेत. मात्र या लसीकरण केंद्रांवर फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध आहे.
बारामतीत शहर आणि तालुक्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लस नसल्याने लसीकरण बंद आहे. ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेत त्यांना दुसऱ्या डोससाठी मॅसेज येत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
कल्याण-डोंबिवलीतही सलग तिसऱ्या दिवशी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 25 लसीकरण केंद्र आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून ती बंद आहेत. आणि आता लस उपलब्ध नसल्याने उद्याही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत.