अमरावती : काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाचा ड्रायव्हर मोबाईलवर बोलत एसटी चालवत असल्याचं उघड झालं होतं. आता अमरावती जिल्ह्यात दर्यापूर आगाराचा एक चालक चक्क बॉनेटवर पाय ठेऊन एका पायाने एसटी चालवत असल्याचा व्हीडीओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय.
एक पाय आरामात बॉनेटवर ठेऊन एका पायाने क्लच, ब्रेक आणि अॅक्सिलेटरचा वापर हा ड्रायव्हर करत असल्याचं उघड झालंय. चालकाच्या या स्टंटबाजीमुळे प्रवाशांचे जीव मात्र धोक्य़ात टाकले जात असल्याचं समोर आलंय.
शनिवारी दुपारी दीड वाजता दर्यापूर बस स्थानकावर एमएच २० बीएफ १९३१ क्रमांकाची बस दर्यापूर ते अंजनगाव सूर्जीसाठी निघाली. बसमध्ये २० ते ३० प्रवासी आणि काही शाळा कॉलेजचे विद्यार्थी होते.
दर्यापूर शहर पार केल्यावर बसचालकाने बस वेगाने पळवण्यास सुरूवात केली. काही अंतर गेल्यावर या चालकाने चक्क एक पाय वर घेत थेट बॉनेटवर ठेवला आणि एका पायाने बस चालवायला सुरूवात केली.
एका प्रवाशाने ही बाब महिला कंडक्टरच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलं. अखेर प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.