चंद्रपूर : तुम्ही आम्ही भाज्या खातो त्या किती स्वच्छ असतात याचा गंभीरपणे विचार करायला लावणारा एक व्हिडिओ, सध्या सोशल मीडियावर व्हायरलत होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा भाजी बाजार अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरातल्या दाताळा मार्गावर, कृषी उत्पन्न बाजार समितीची महात्मा फुले भाजी मंडई आहे. या भाजीबाजारात चंद्रपूरकर ग्राहकांच्या आरोग्यासोबतचा धक्कादायक खेळ पुढे आला आहे. इथे चक्क प्रसाधनगृहा शेजारी असलेल्या डबक्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा हा व्हिडिओ आहे.
भाज्या ताज्या दिसाव्यात यासाठी भाज्या पाण्यात भिजवण्याकरता, अक्षरशः अस्वच्छ पाण्याचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे बाजार समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांची या भागातून सतत येजा असते. तरी कुणीही या प्रकारावर आक्षेप घेतलेला नाही. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शहरातल्या गृहिणी आणि नागरिकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.