गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली. या हत्येच्या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेवत असतानाच मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मानेवर कुऱ्हाडीने वार करत मित्रानेच त्याच्या मित्राचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे.
मृतकाचं नांव संतोष घोरमोडे असून त्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध धनज पोलीस घेत आहेत. हत्या झालेला व्यक्ती आणि हत्या करणारा हे दोघे सोबत काम करणारे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. नेहमी सोबत असणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राची मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना रात्री 9 च्या सुमारास वाशिमच्या कारंजा तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतः च्या घरी येऊन जेवण करत होता. त्याचवेळी मित्राने अचानक येऊन संतोषच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने जागेवरच संतोषचा मृत्यू झाला.
वाशिमच्या बेपत्ता मुलीचा विहीरीत आढळला मृतदेह
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील 11 वर्षीय मुलगी 15 फेब्रुवारी रोजी घरून बेपत्ता झाली होती.तिचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आलाय. यामुळं गावात मोठी खळबळ उडाली. प्राची अमोल घुगे असं मृतक मुलीचं नावं असून ती 15 फेब्रुवारीला घरातून अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. अखेर जऊळका पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्यात आली.पोलिसांनीही शोधपत्रिका जारी करून, मुलीला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर एरंडा येथीलच एका विहिरीत प्राचीचा मृतदेह तरंगताना दिसून आला.तो बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास जऊळका पोलिस करीत आहे.
चंद्रपुरात डंपिंग यार्डमध्ये आढळला युवकाचा मृतदेह
चंद्रपुरात डंपिंग यार्ड मध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गुन्हेगारी वृत्तीच्या सुरजसिंह कुंवर (25) याची अष्टभुजा वॉर्ड परिसरात दहशत होती. एका दारू पार्टीत त्याचा साथीदारांशी वाद झाल्यावर पाच जणांनी मिळून सुरजसिंह याला धारदार शस्त्रांनी संपवले. शवाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क डंपिंग यार्डमध्ये टाकण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी घटनास्थळी रक्ताचे थारोळे पाहिल्यावर नागरीकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खबरी जाळे विणत या प्रकरणाचा माग काढून मृतदेह हुडकून काढला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला आहे.