Raj Thackeray On Maharastra Politics: महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात राजकारण सुरू आहे त्यावर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची (Ek Sahi Santapachi) ही मोहीम राबविली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवरुन नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात ही मोहीम राबवल्यानंतर या मोहिमेच्या बॅनरचं प्रदर्शन शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर लावण्यात आलं होतं, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे बॅनर पायी चालत पाहिलं. यावर लिहिलेले काही संदेशही वाचले. त्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केल्याचं दिसून आलं. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी महाराष्ट्रात मागचे दीड ते दोन वर्षे जे राजकारण सुरू आहे ते फार घाणेरडं आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
प्रत्येक घरात संतापाचं वातावरण आहे. गेल्या काही दोन वर्षापासून आपण राजकारण बघतोय, हे संतापजनक आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे. ज्यांना राजकारणासमोर येयचंय, त्यांच्यासमोर काय ताट वाढलंय. सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण होतंय, त्यातून काहीही मिळणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांना अधिवेशनावर (Maharashtra Monsoon Session 2023) प्रश्न विचारला गेला. अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा सवाल राज ठाकरे यांना विचारल्यावर त्यांनी एका शब्दात विषय संपवला.
अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा प्रश्न केल्यावर राज ठाकरे यांनी 'घंटा' असं उत्तर दिलं. राज ठाकरे यांच्या या उत्तरामुळे एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली वाट धरली. यावेळी राज ठाकरे एका नव्या अवतारात दिसून आले. अंगात जॉकेट, हातात हिरवं घड्याळ अन् डोळ्यांवर गॉगल असा हा लुक होता.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) एक सही संतापाची हे अभियान राबविण्यात आलं. या बॅनरवर नागरिकांनी सहीच नाही तर विविध संतापलेले मत सुद्धा मांडले आहेत. मनसेच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. मात्र, या मोहिमेचा मनसेला फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.