प्रताप नाईक / कोल्हापूर : Widows Practice is permanently closed : आता एक चांगली बातमी. 21 व्या शतकातील नवा आदर्श समाजासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद करण्यात आली आहे. यासाठी गावाने पुढाकार घेत महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या प्रथा आता बंद करण्यात आली आहे. आज मातृदिनी हा महत्वाचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. याला महिला अनुमोदक होत्या. प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी हेरवड गावाने हा मोठा पुढाकार घेतला आहे.
सरपंच सुरगोंडा पाटील हे अध्यक्ष होते. असा ठराव करणारी हेरवाड कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कुंकू पुसण्यात येते, बांगड्या वाढविल्या जातात, जोडवी काढण्यात येतात, त्याचबरोबर आयुष्यभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही, अशी सद्य:स्थिती आहे. विधवा प्रथेमुळे सन्मानाने जगण्याच्या महिलेच्या हक्कावर गदा येत होती. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला.
हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथेला तीव्र विरोध करण्यात आला होता. ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथेविरोधात ठराव करण्यात आला. हा ठराव मांडण्यात आला नाही तर तो बहुमताने मंजूर करण्यात आला. गावात यापुढे पतीच्या निधनानंतर विधवा प्रथेचे कोणतेच कार्यक्रम होणार नसल्याचा ठराव केला गेला. ग्रामसभेत सर्वानुमते विधवा प्रथेला विरोध करण्यात आला होता. ग्रामसभेत सूचक आणि अनुमोदक महिला राहिल्या. आता ही प्रथा या गावातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श अन्य गावे घेतील, असा हा ऐतिहासिक निर्णय आहे.