Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघातावेळी राजेश शहा हे कारमध्ये नव्हते. मात्र, राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर कारमध्ये होते. आरोपी मुलगा सध्या फरार आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वरळीतील एनी बेझंट मार्गावर अॅट्रीया मॉल जवळ ही घटना घडली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्य स्कुटरवरुन जात असताना बीएमडब्यू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही कारच्या बोनटवर पडले. कार चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेली. प्रदीप नाखवा हे बाजूला फेकले गेले तर कावेरी नाखवा ह्या बोनटवरून खाली पडल्या आणि त्यांच्या साडीचा पदर कारमध्ये अडकल्याने त्या फार पुढे फरफटत गेल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली. वरळी पोलिसांनी या प्रकरणी तपास करत सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर कार आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अतिरिक्त पोलिस आयुक्त अनिल पारसकर यांनी स्वतः घटनास्थळी पोहचून पाहणी केली होती. पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर ही कार शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांची असल्याचे समोर आले.
पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. मात्र वरळी हिट अॅड रन प्रकरणात ते कारमध्ये नव्हते तर त्यावेळी त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा सध्या फरार असून पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागला असून चालक मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर मुंबईतही अशाच प्रकारचा अपघात घडल्याने पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.