मुंबई : साता-यातील वाई तालुक्यातल्या सुरूर गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पूजल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजा केली. हा सगळा प्रकार उघडकीस येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलीचे नातेवाईक फरार झाले आहेत. पण, अल्पवयीन मुलीची पूजा का करण्यात आली...? याचा तपास सुरू आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अघोरी कृत्याने लोकांची मानसिकता उघड झाली आहे. मांत्रिकाच्या आदेशानं मुलीला प्रथम वाईतील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर तिची नदीकाठावर पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर मुलीला सुरूर येथील स्मशानभूमीत पुजण्याचा घाट घालण्यात आला. पुणे हडपसर येथून आलेली ही मुलगी व तिचे नातेवाइक मांत्रिकासह फरार झाले असून याबाबतचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत. दरम्यान, या अंधश्रध्देच्या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
सातारा हा अंधश्रद्धा निमुर्लन संस्थेचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांचा जिल्हा. या जिल्ह्यात बुवाबाजीच्या अनेक घटना आजही उघडकीस येत आहेत. ही बुवाबाजी मुळासकट उपटून टाकण्यासाठी समाजाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. परंतु तसं होताना दिसत नाही. हे देखील तितकेच खरं आहे.