परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनींना हॉलतिकीट दाखवताच बसला धक्का; वाचा नेमकं काय घडलं

नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थीनींना मोठा धक्का बसला आहे

Updated: Jul 24, 2022, 07:05 PM IST
परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनींना हॉलतिकीट दाखवताच बसला धक्का; वाचा नेमकं काय घडलं title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : तुम्ही सर्व तयारी करुन परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलात आणि त्यावेळी तुमचे हॉलतिकीटच चुकीचे असल्याचे तुम्हाला कळले तर काय होईल? याचा विचारही आपण करु शकत नाही. मात्र यवतमाळमध्ये (Yavatmal) काही विद्यार्थिनींवर असाच प्रसंग ओढावला आहे.

बनावट हॉल तिकीट बनवून सायबर कॅफे चालकाने विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ मध्ये घडला आहे. या फसवणुकीमुळे विद्यार्थिनींचे मोठे नुकसान झाले आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरल्याचे खोटे सांगून त्यांना बनावट हॉल तिकीट देत  फसवणूक करणाऱ्या सायबर कॅफे चालकाविरुद्ध यवतमाळ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गिरीष गेडाम असे या सायबर कॅफे चालकाचे नाव असून त्याच्या या फसवणुकीमुळे विद्यार्थिनींना नीट परीक्षेपासून (NEET Exam) वंचित राहावे लागले आणि त्यांचे शैक्षणिक नुकसानही झाले.

या प्रकरणी नंदिनी मोकळकर व वृषाली गिरी या विद्यार्थिनींनी तक्रार दिली. या विद्यार्थीनींनी कानन सायबर कॅफेमध्ये नीट परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठी गिरीश गेडामला कागदपत्रे दिली होती. यावेळी त्याने लिंक नसल्याचे सांगत फॉर्मची प्रिंट नंतर देतो, अशी बतावणी करून विद्यार्थिनींकडून 1700 रुपये घेतले. 

त्यानंतर सायबर कॅफे चालकाने परीक्षेसाठीची दुय्यम प्रत व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविली. त्यानंतर हॉल तिकीटची प्रिंट देखील व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. मात्र ज्यावेळी विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी गेल्या तेव्हा दिलेल्या आसनावर वेगळेच विद्यार्थी होते. त्यांनी कुठलाच अर्ज न भरल्याचे दिसून आले. 

सायबर कॅफे चालकाने नीटच्या वेबसाईटवरून दुसऱ्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट डाउनलोड करुन त्यात फेरफार केली. त्यानंतर ते बनावट हॉलतिकीट विद्यार्थिनींना दिले. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर हा सर्व फसवणूकीचा प्रकार समोर आला. दरम्यान, याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.