Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. तसेच यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच. नांदेडमध्ये (Nanded) आणखी एका तरुणाने आरक्षणसाठी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका अशी चिठ्ठी लिहीत या तरुणाने आत्महत्या केली आहे.
तीन दिवसांपूर्वीच सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे शुभम पवार याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली. शुभमच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय शुभम पवार हा प्लंबर म्हणून काम करत होता. शनिवारी तो रेल्वेने मुंबईहून रेल्वेने नांदेड येथे आला होता. वडिलांना फोन करुन शुभमने आपण बहिणीकडे जाऊन फ्रेश होऊन गावी येतो असे सांगितले. मात्र संध्याकाळी सातपर्यंत शुभम घरी परतला नाही. वडिलांनी वारंवार त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याच्या भावाने पुतणीला फोन करुन शुभमबाबत विचारणा केली. त्यावर शुभम इथे आला नसल्याचे त्यांनी सांगितले. शुभमच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन जाऊन तपासले असता नरहरी मंगल कार्यालयाच्या शेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.
शुभमच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाचा डब्बा, पावती आणि एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण देण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे बलिदान वाया जाऊ नये, असे लिहीले होते. पोलिसांनी शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी रुग्णालयात पाठवला होता.
मागण्या मान्य होई पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही - सकल मराठा समाज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील वडगाव येथील 24 वर्षीय शुभम पवार या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिट्टी लिहली. त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान मयताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाखांची मदत , मयत युवकाच्या बहिणीला शासकीय नोकरी, कुटुंबाला घरकुल या मागण्या मान्य होऊ पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आली. युवकाचा मृतदेह नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आहे.