तुळजापूर : तुळजापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर गाड्या का लावल्या अशी विचारणा पोलीस उपनिरीक्षकाने युवा सेनेच्या कार्यकर्त्याला केली होती. यावर उत्तर म्हणून शिवसेना युवा तालुकाप्रमुख प्रदीप रोचकरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
या जबर मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांच्या छाती आणि हातावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करण्यात आले आहेत. मारहाण करणाऱ्या प्रदीप रोचकरी आणि अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. पण ही अटक होताच त्यांच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे तुळजापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त मागवला.
पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांनी, क्षुल्लक कारणावरून गलिच्छ शिवीगाळ केल्याने काही संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, झालेला प्रकार चुकीचा असला तरी शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे ? असा सवाल युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी करत याप्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.