मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास नसल्यामुळेच मराठा समाज आक्रमक झाल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी कडू यांनी म्हटले की, सरकारमध्ये स्पष्टता नसल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली. गेले कित्येक दिवस आरक्षणबाबत उडवाउडवीचं उत्तरं येत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा मराठा आंदोलकांना आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या शब्दावर कोणाचाही विश्वास नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांवर जमाव चालून आल्याने माघारी पळत असताना पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, काही वेळापूर्वीच मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांनी मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.