Mumbai Coronavirus : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा धोका काही अंशी कमी होतानाचं चित्र असतानाच या विषाणूची तिसरी लाट देशात धडकणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आली. ज्यानंतर संपूर्ण देशातच या संकटाशी दोन हात करण्यासाठी नव्यानं नियमावली लागू करण्यात आल्या. काही अंशी शिथिलता देण्यात आलेले नियम पुन्हा कठोर करण्याच्या निर्णयावर प्रशासन पोहोचलं.
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका नेमका किती असणार, याबाबतचे प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एका निरिक्षणातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Mumbai) मुंबई आणि मुंबईकरांच्या दृष्टीनं ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं जाहीर केल्यानुसार मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसून मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे. जवळपास 80 टक्के मुंबईकरांना कोरोना होऊन गेला आहे. परिणामी कोरोनामुक्त मुंबईकरांमुळे शहरातील नागरिकांना कोरोनाचा धोका कमी आहे असं टीआयएफआरच्या अहवालातून सांगण्यात आलं आहे. यामुळं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुंबईला धोका नाही, असं या निरिक्षणाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
TIFR चे डीन डॉ. संदीप जुनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील उर्वरित 20 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झालेली नसली तरीही यापैकी बहुतांशजणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, काहींनी पूर्ण लसीकरण करत या विषाणूपासुन सुरक्षित राहण्याचा मार्ग अवलंबला आहे, त्यामुळं कोरोना संसर्गाचा धोका त्यांनाही कमी आहे.
Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान
पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण कमी असून, नव्या व्हरिएंटचे रुग्णही कमी आहेत. शिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसी घेत नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीही निर्माण झाली आहे, त्यामुळं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे परिणाम बऱ्याच अंशी कमी असतील.