मी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन

Jaipur Superfast Express Firing Case : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी विरोधात मुंबई पोलिसांनी आरोपी 1,029 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Updated: Oct 22, 2023, 02:56 PM IST
मी स्वतःला गोळी मारू का?, चौघांच्या हत्येनंतर चेतनसिंहने पत्नीला केला होता फोन  title=

जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (jaipur mumbai superfast express) गोळीबार प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा (RPF) बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. चौधरी याच्यावर 31 जुलै रोजी चालत्या ट्रेनमध्ये आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची आणि तीन प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. चेतन हा मानसिकदृष्ट्या कमकुवत नसल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रामधून चेतनसिंहबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आरोपी चेतनसिंह चौधरी याने उत्तर प्रदेशातील आपल्या मामाला फोन करून टीव्ही न्यूज चॅनेलवर स्वत:बद्दलची ब्रेकिंग न्यूज पाहण्यास सांगितले होते. आरोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे. चेतनसिंहने पहाटे साडेचार वाजता त्याचा मामा वासुदेव सिंह सोलंकी यांना फोन केला होता. मुंबई पोलिसांच्या 1,029 पानांच्या आरोपपत्रात ही महत्त्वाची बाब समोर आली आहे. चेतनसिंह चौधरीचे त्याच्या मामाशी चांगले संबंध होते. 

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांना गोळ्या घालण्यापूर्वीच चेतनसिंहने त्याच्या मामाला फोन केला होता. तो फोन वासुदेव सिंह यांच्या पत्नीने फोन उचलला आणि मामा झोपले असल्याचे सांगितले. हा फोन करण्यापूर्वी चेतनसिंहने वरिष्ठ एएसआय टिकाराम मीणा यांना त्याची प्रकृती ठीक नसल्याने सांगत मला वलसाड किंवा वाशी येथे उतरण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र मीणा यांनी ही विनंती फेटाळत काही तासांनंतर तुझी ड्युटी संपणार आहे म्हणून इथेच विश्रांती घे असे सांगितले होते.

चौघांच्या हत्येनंतर सकाळी 6.10 वाजता चेतनसिंहने मामाला दुसऱ्यांदा फोन केला. यावेळी वासुदेव सिंह यांनी फोन उचलला. यावेळी चेतनसिंहने मामाला सांगितले की, त्याने आपल्या रायफलने वरिष्ठ आणि तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या आहेत. त्यावर मामाने, माझा त्याच्यावर विश्वास नाही असे सांगितले. त्यानंतर चेतनसिंहने मामाला टीव्ही चालू करून 'ब्रेकिंग न्यूज' पाहण्यास सांगितले. यानंतर चेतनसिंहने पुढे काय करायचे असे विचारले. मामाने त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्यानंतर वासुदेव सोलंकी यांनी टीव्ही चालू करून चेतनसिंहची बातमी पाहिली. त्यानंतर त्याने चेतनसिंहच्या पत्नीला फोन करुन या घटनेची खात्री केली.

चेतनसिंहने पत्नी प्रियंका चौधरी हिलाही फोन करून या घटनेबाबत सांगितलं होतं. 'मी खूप मोठी चूक केली आहे. आपल्या दोन्ही मुलांना नीट सांभाळ. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, जर तू सांगशील तर मी स्वतःला गोळी मारू का?' असे चेतनसिंहने पत्नीला सांगितले होते.