पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी, हाय अलर्ट जारी

पुलवामा हल्ल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे.  

Updated: Feb 23, 2019, 09:43 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमान अपहरणाची धमकी,  हाय अलर्ट जारी title=

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. यातच आता एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करुन विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, 'एक विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल.' दरम्यान, या घटनेनंतर देशातील सर्व विमानतळांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत फोन कोणी केला त्याचा पत्ता लागलेला नाहिये. मात्र पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहे.

या धमकीमुळे देशभरातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच विमानतळांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. विमानतळावरून एका विमानाचे अपहरण करण्यात येणार असून ते विमान पाकिस्तानला नेण्यात येणार असल्याचे सांगितले. या फोननंतर ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटीने सर्व विमानतळांना सतर्क केले आहे. प्रत्येक विमानतळासाठी आणि विमान कंपन्यांसाठी सुरक्षेच्या बाबतीतली नवीन नियमावली तयार केली आहे. त्या नियमावलीनुसार विमानतळ परिसरात तसेच रनवे जवळ येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. 

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी १९९९मध्ये काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाचे अपहरण करून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला भारताच्या तावडीतून सोडविले होते. त्याच पार्श्वभूमीवर दहशतवादी पुन्हा एकदा भारतातील विमान हायजॅक करण्याच्या तयारीत आहे. तशा प्रकारची धमकीच दहशतवाद्यांकडून देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी एअर इंडियाला एक निनावी कॉल आला आहे. त्याद्वारे विमान अपहरण करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.