महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित शहरं! मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं डेंजर झोनमध्ये; तुम्हीदेखील या परिसरात राहता का? वाचा यादी

सर्वाधिक प्रदुषित शहरं असणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे

शिवराज यादव | Updated: Jan 10, 2025, 08:26 PM IST
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित शहरं! मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं डेंजर झोनमध्ये; तुम्हीदेखील या परिसरात राहता का? वाचा यादी title=

मुंबईत आता श्वास घेणंही धोकादायक बनत चाललं आहे. कारण मुंबईतली एक दोन नाही, तर तब्बल बारा ठिकाणं ही प्रदुषणाच्या दृष्टीनं डेंजर झोनमध्ये आहेत. तर सर्वाधिक प्रदुषित शहरं असणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. उपाययोजनांचे दाखले देऊनही मुंबई आणि राज्याची हवा का बिघडत आहे? हे जाणून घेऊयात 

मुंबईची हवा बिघडली
मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं डेंजरझोनमध्ये
मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात

राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहेत. या ठिकाणी मोकळा श्वास घेणं हे सिगरेटचा धूर छातीत भरुन घेण्याच्या धोक्यापेक्षा कमी नाही आहे. कारण या 12 ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिधोकादायक पातळीच्याही खाली गेली आहे. 

या 12 ठिकाणांवरील हवा ही अतिधोकादायक -

- बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स  
- बोरिवली पूर्व  
- भायखळा  
- चेंबूर  
- देवनार  
- घाटकोपर  
- कांदिवली पश्चिम  
- खेरवाडी बांद्रा पूर्व 
- मालाड पश्चिम  
- माझगाव मुंबई  
- नेव्ही नगर-कोलाबा  
- सिद्धार्थ नगर-वर्ली 

वायु प्रदुषणावर काम करणा-या वातावरण फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुंबईच्या प्रदुषणात प्रचंड वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इतक्या गंभीर हवा प्रदुषणाच्या संकटाला सामोरी जात आहे. 

मुंबई कायमच तिच्या वैशिष्ट्यांमुळे ओळखली जाते. मात्र औद्योगिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रात नंबर वन असणा-या मुंबईनं प्रदुषणातही आता अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील 18 शहरं सर्वाधिक प्रदुषीत शहरं ठरली आहेत. 

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा राज्य सरकार, महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. याउलट समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे उपाययोजनांचे केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा ठोस उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.