मुंबई : राज्यातील मागील तीन वर्षांमध्ये रिक्त झालेल्या एकूण पदापैकी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची ५ हजार ५०० पदे तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरावर सुरु करण्यात येत आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदभरतीवर निर्बंध लावण्यात आलेले होते. हे निर्बंध हटवून आता मागील तीन वर्षात रिक्त झालेल्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या जागा रिक्त असल्याने कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमात अडचणी येत आहेत. आता या रिक्त जागा तातडीने भरण्यात येऊन कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम गतीने राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले
मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आणि कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यानंतर महिला व बाल विकास विभागाच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त जागा भरणेबाबत चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात आलेले आहे, असे ड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.