मुंबई : राज्य विधीमंड़ळात मनसुख हिरेन प्रकरणावर गदारोळ पहायला मिळाला. त्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला आक्रमकपणे घेरले होते. परंतु यावर अन्वय नाईक यांच्या कुटूंबीयांनी आक्षेप घेतला आहे. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विधीमंडळात मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे संशयीत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे 3 वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या अन्वय नाईक यांच्या कुटूंबियांनी याबाबत आक्षेप घेतला आहे.
नाईक कुटूंबियांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, 'राज्यात एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय आहे का? एखाद्या प्रकरणात नुसत्या संशयावरून तत्काळ कारवाईची मागणी होत असेल. तर अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये तर आरोपींची नावं स्पष्टपणे नमूद आहेत. तेव्हा आताच्या विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका का नाही घेतली?'
'आम्ही तीन वर्षे झाले न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. तत्कालीन सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले होते. खटला बंद करण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्यात येत होता. त्यामुळे तत्कालीन सरकारची चौकशी करा. सध्याच्या सरकारनेही उशीरा का होईना आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आम्हाला धमक्यांचे नेहमी फोन येत असतात. त्याचीही चौकशी व्हावी. आपल्या लोकशाहीत श्रीमंतांनाच न्याय मिळतो का?' असा सवालही नाईक कुटूंबियांनी केला आहे.