वृक्षतोड करुन विकासकामे का केली जातात? मेट्रो वुमन आश्विनी भिडेंनी सांगितलं कारण

Ashwini Bhide Interview:  मुंबईची ओपन हार्ट सर्जरी सुरु होती पण यावेळी शहराला कोणताही अनेस्थेशिया देण्यात आला नाही, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2024, 06:02 PM IST
वृक्षतोड करुन विकासकामे का केली जातात? मेट्रो वुमन आश्विनी भिडेंनी सांगितलं कारण title=
मेट्रो वुमन अश्विनी भिडे

Ashwini Bhide Interview: ट्राफिक सिटी म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबईची दुसरी लाईफ लाईन मेट्रोनं एन्ट्री केली. कधीही न झोपणाऱ्या मुंबईमध्ये मेट्रोचे काम करणं किती आव्हानात्मक होतं याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली. मेट्रोमुळे मुंबई बदलतीये. मेट्रो ३ हा प्रकल्प कसा गेमचेंजर ठरलाय, याची माहिती त्यांनी दिली. काम सुरु केलं आणि पूर्णत्वास गेलं ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे त्या सांगतात. 'झी 24 तास'च्या 'महाराष्ट्र एक पाऊल पुढे' कार्यक्रमात राज्यातील औद्योगिक बदलांवर चर्चा करण्यात आली. या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

सामाजिक, राजकीय आव्हानातून कसे बाहेर आलात?

मुंबईत बस, रेल्वेचे जाळे आहे. पण याला कनेक्टिव्हीटी नव्हती. मुंबईच्या उत्तर भागापासून दक्षिण भागापर्यंत भुयारी जागा तयार केली. हा प्रकल्प आपण तयार केला. मुंबईची ओपन हार्ट सर्जरी सुरु होती पण यावेळी शहराला कोणताही अनेस्थेशिया देण्यात आला नाही. मुंबई कुठे थांबली नाही, असे त्यांनी सांगितले. 

तांत्रिकदृष्ट्या किती आव्हानात्मक?

आयएएस क्षेत्रात सातत्याने नवीन करण्याची संधी असते. सुदैवाने मला प्रोजेक्ट मिळत गेले. या क्षेत्रातील सखोल ज्ञान असायलाच हवे असं नसतं. यातील तज्ञ तुमच्यासोबत असतात. सर्वांचा मेळ घालून चांगल काम कसं करायचं ही भूमिका माझी होती. माझ्यासोबत खूप चांगली टीम होती. वेळच्यावेळी कामे कशी होतील. हे पाहायचं होतं. इंजिनीअरिंग प्रोजक्ट जमिनीवर प्रत्यक्षात करताना इतर अनेक बाह्य घटक येतात. बोर्डवर ठरवलेल्या कामात बदल करावे लागतात, असे त्या म्हणाल्या. मुंबईसारख्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सुरळीत प्रवास करणे सोपे असायला हवे. गर्दी वाढली तेव्हा उपनगरीय सेवा कमी पडू लागल्या. अशावेळी मेट्रो प्रकल्पांची गरज भासू लागली. मुंबईकरांना रस्ते, मेट्रो, रेल्वे सर्वाची गरज आहे. रस्ते विकसित होण्याला मर्यादा आहे. अशावेळी सागरी अंतर्गत वाहतूकची गरज होती. या सर्वात मेट्रो मुंबईकरांच्या फायद्याची ठरेल असे अश्विनी भिडे यांनी सांगितले. 

मेट्रोचे पुढचे टप्पे किती आव्हानात्मक?

पहिला टप्पा पूर्ण झालाय त्यात 10 स्टेशन आहेत. यापुढे 20 किमीचा मार्ग ज्यात 16 स्थानके आहेत. याचे ९० टक्के काम पूर्ण झालंय. गिरगाव, वरळीला स्थापत्य कामे सुरु आहे. मार्च ते मे 2025 पर्यंत हा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

विकास प्रक्रियेत झाडं हा कळीचा मुद्दा?

विकास कामावेळी काही गोष्टींना धक्का लागतो. मेट्रो 3 नव्हे तर सर्व प्रकल्पांवेळी वृक्षतोड करावी लागते. कायदेशीरदृष्ट्या याला मनाई नाही. ही वृक्षतोड कशी करावी याचे नियम आहेत. याचे पालन केले जाते. ट्री अथोरीटीकडे आम्ही प्रस्ताव पाठवल्यावर त्याची छाननी होते. अनेक संस्था याबाबत न्यायालयात गेल्या. उच्च न्यायालयाने याबाबत कमिटी नेमली. जागेवर जाऊन नव्याने केलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी केली. मुंबईत असंख्य प्रकल्प सुरु आहेत. या सर्वात वृक्षतोड केली जाते. पण मेट्रो ३ च्या वेळेला अनेक बंधन आली. आम्ही पर्यायी वृक्ष लागवड केली. मेट्रोमुळे इंधनाची बचत होणार आहे. 

मुंबई हे माझं दुसरं घर

मुंबई हे माझं दुसरं घर झालंय.मुंबईचं स्वरुप बदललंय. प्रकल्प पूर्ण झाल्यावर खुल्या जागा इतर बाबींची वाढ व्हायला हवी. मुंबईकरांचं जीवनमान उंचावतय, यासाठी हातभार लावण्याची संधी मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.