मुंबई : एकेकाळी ज्या ज्या नेत्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून मिरवलं, त्यांनी विचारही केला नसेल अशी त्यांची अवस्था गेल्या अवघ्या पाच वर्षांत झालीय. यालाच कदाचित नियतीचा खेळ म्हणत असावेत.
पाच वर्षांपूर्वी... वर्ष २०१४...
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं रावेरमधून हरिभाऊ जावळेंना तिकीट दिलं होतं. एकनाथ खडसेंनी हरिभाऊ जावळेंसह पत्रकार परिषद घेत जावळेंना तिकीट मागे घ्यायला लावलं आणि रक्षा खडसेंना रिंगणात उतरवलं.
पाच वर्षांनंतर... वर्ष २०१९
आज (४ ऑक्टोबर २०१९) खडसेंनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. पक्षानं खडसेंना तिकीट दिलंच नाही. पण, त्यांच्याऐवजी मुक्ताईनगरमधून पक्षानं त्यांचीच मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं. खडसेंना स्वतःचीच उमेदवारी मागे घ्यावी लागली.
तीन वर्षांपूर्वी... वर्ष २०१७
काँग्रेसच्या प्रविण छेड़ा यांचा पराभव करण्यासाठी प्रकाश मेहतांनी पराग शाह यांना भाजपात आणलं.
तीन वर्षांनंतर... वर्ष २०१९
आज पराग शाहांनीच प्रकाश मेहतांचा पत्ता कट केलाय. घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांऐवजी पराग शाह यांना उमेदवारी मिळालीय.
पाच वर्षांपूर्वी... वर्ष २०१४
काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंचा कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईकांनी पराभव केला आणि कणकवलीमधून काँग्रेसचे नितेश राणे भाजपाच्या प्रमोद जठारांचा पराभव करुन विजयी झाले. एकाच घरात विजय आणि पराभवाचं हे सुख-दुःख...
पाच वर्षांनंतर... वर्ष २०१९
नितेश राणे गपचूप भाजपात आलेत... तेही ज्यांचा पराभव केला त्या जठारांच्या उपस्थितीतच त्यांचा भाजपा प्रवेश झालाय. नारायण राणेंना अजूनही भाजपा आपलं म्हणायला तयार नाही. शिवसेनेचं विसर्जन करण्याची भाषा करणारे राणे स्वतःचा पक्ष विसर्जित करुन भाजपावासी होत आहेत.
चार वर्षांपूर्वी... वर्ष २०१५
संजय निरुपम मुंबई अध्यक्ष झाले. उमेदवार निवडीत किमान मुंबईपुरता तरी निरुपमांच्या शब्दाला मान होता.
चार वर्षांनंतर... वर्ष २०१९
आज संजय निरुपम यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आलीय. मुंबईतल्या तीन-चार जागा सोडल्या तर इतर ठिकाणी काँग्रेसची अनामत रक्कमही जप्त होईल, असं भाकीत आज त्यांनी वर्तवलंय. शिवाय पक्षासाठी प्रचार करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
माझ्याशिवाय पक्षाचं पान हलणार नाही, असं वाटणाऱ्या सगळ्यांचे दिवस अवघ्या पाच वर्षांत पालटलेत. इनीथिंग ऍन्ड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह, वॉर ऍन्ड पॉलिटिक्स... हेच खरं!