मुंबई : गेले दोन दिवस पवार कुटुंबीयांनी वेगवेगळ्या कारणांनी गाजवले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांची ईडी कार्यालयाला भेट आणि अजित पवार यांचा राजीनामा नाट्य चांगलंच रंगलं. आज पवार कुटुंबातील तिसरी पिढी आणि राष्ट्रवादीचे भावी प्रमुख नेते म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रोहित पवार यांचा वाढदिवस... शनिवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर, अजित पवार यांच्याबद्दल 'झी २४ तास'शी बोलताना रोहित पवार यांनी अजित दादांविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 'राजकीय क्षेत्रात आपला प्रवेश झाल्याचं खुद्द अजित पवार यांनीच जाहीर केलं होतं. इतकंच नाही तर खासगी आयुष्यातही अनेकदा दादांची मदत झाल्याचं' रोहित यांनी मान्य केलं. आपला आणि आपली पत्नी कुंती मगर-पवार यांचा विवाह ठरवण्यासाठी दादांचा मोठा हातभार होता, असं सांगतानाच पार्थ आणि आपल्यात कुठलीही स्पर्धा नाही, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.
उल्लेखनीय म्हणजे, आज रोहित पवार यांचा वाढदिवस... ठिकठिकाणच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. पण रोहित पवार यांच्यासाठी हा दिवस आणखी एका कारणासाठी खास आहे. ते कारण म्हणजे आज त्यांच्यासोबतच त्यांच्या सहचारिणी कुंती यांचाही वाढदिवस असतो. 'आज माझ्यासोबतच माझ्या पत्नीचाही वाढदिवस असल्यामुळे आजचा दिवस नेहमीच कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो' असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजकारणात नवीनच असलेल्या रोहित पवार यांच्याविषयी जनतेत मोठी उत्सुकता आहे. रोहित हे शरद पवारांचे चुलत नातू अर्थात शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचे नातू आणि राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. सोबतच, 'बारामती ऍग्रो लिमिटेड कंपनी'चे ते संचालक आहेत.
खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर पुण्यातील बिल्डर सतीश मगर यांची मुलगी 'कुंती' या त्यांच्या पत्नी आहेत. कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन केलीय. रोहित-कुंती या जोडप्याला दोन मुली आहेत.
रोहित आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. परंतु, काही दिवसांपूर्वी रोहित यांनी सोशल मीडियावरून 'बाबा कुठे आहेत या मुलांच्या प्रश्नाला तूच आई आणि तूच बाबा होवून उत्तर देतेस' असं म्हणत आपल्या सहचारिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिचं कौतुकही केलं होतं.