मुंबई : राज्याचा मुख्य प्रशासकीय कारभार ज्या इमारतीमधून चालतो, त्या मंत्रालयात सध्या सर्वसामान्यांची अलोट गर्दी उसळलेली बघायला मिळत आहे. कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत. तसंच सरकारच्या शेवटच्या दोन - तीन मंत्रीमंडळ बैठका होणंही अपेक्षित आहे. तेव्हा आपलं काम मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात सध्या सर्वसमान्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने आता राज्य सरकारकडून लोकप्रिय निर्णयांचा धडाका सुरू झाला आहे. त्यातच आज राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत तब्बल २५ निर्णय घेतले. त्यात विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांचा विषय कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
त्याशिवाय शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात रुपांतर करणे, ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करणं अशा २५ निर्णयांचा समावेश आहे. याआधीच्या मंत्रिमंडळ बैठकीतही असेच १९ निर्णय घेतलेले. आता विद्यमान फडणवीस सरकारच्या आणखी दोन मंत्रिमंडळ बैठका अपेक्षित आहेत. त्यातही वारेमाप निर्णय घेतले जातील असे समजत आहे.