54 सेकंदांचा थरारक Video; काही कळायच्या आतच दोन वेगवान बसमध्ये आला माणूस, चमत्कारिकरित्या वाचला जीव

Viral Video : रस्त्यावरील सर्वच वाहनं थांबली. सर्वांना वाटलं... रस्ता ओलांडताना नेमकं काय घडलं? सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय 54 सेकंदांचा व्हिडीओ

सायली पाटील | Updated: Jan 27, 2025, 10:12 AM IST
54 सेकंदांचा थरारक Video; काही कळायच्या आतच दोन वेगवान बसमध्ये आला माणूस, चमत्कारिकरित्या वाचला जीव  title=
viral video Tamil Nadu Man Trapped Between 2 Buses Escapes Death watch

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक थरराक व्हिडीओ व्हायरल होत असून, अवघ्या 54 सेकंदांच्या या व्हिडीओनं अनेकांचेच प्राण कंठाशी आणल्याचंही पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर पाहिला जाणारा हा व्हिडीओ तामिळनाडूतील असल्याचं म्हटलं जात आहे. 

अनेकांनीच हा व्हिडीओ रिशेअर करत आणि त्यावर व्यक्त होत त्या 54 सेकंदांमध्ये जे काही घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वासच बसला नाही, अशाही प्रतिक्रिया दिल्या. कारण, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या त्या व्यक्तीनं जवळपास मृत्यूच पाहिला होता. एका CCTV मध्ये घडलेली संपूर्ण घटना कैद झाली आणि हा थरार नेटकऱ्यांनाही हैराण करून गेला. 

कोणत्या घटनेनं हादरा? 

प्राथमिक माहितीनुसार तामिळनाडूतील भरत नावाची ही व्यक्ती थमरनकोट्टई ते पट्टूकोट्टई असा प्रवास करत होती. तिथं भरतला एक खासगी बस पकडायची होती. यासाठी त्यानं पाऊल पुढे टाकलं तेव्हाच खासगी बसला ओव्हरटेक करणारी एक सरकारी बस मागून आली  आणि भरत दोन्ही बसच्या मध्ये तयार झालेल्या चिंचोळ्या वाटेत फसला. ही काही सेकंद इतकी घाबरवणारी होती, की होत्याचं नव्हतं होतं की काय, हीच भीती अनेकांच्या मनात घर करून गेली. पण, दोन्ही वेगवान बसच्या कचाट्यात सापडलेल्या या माणसाला किरकोळ खरचटणं वगळता इतर कोणतीही दुखापत झाली नाही.

हेसुद्धा वाचा : Coronavirus बाबत जगाला हादरवणारा खुलासा; नेमकी कुठून झाली उत्पत्ती? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच चीनवर गंभीर आरोप  

समयसूचकतेमुळं वाचला जीव... 

सरकारी बस येताच खासगी बसच्या पत्र्याला भरत जवळपास टेकला आणि त्यानं कसाबसा तोल सावरला. सरकारी बस जेव्हा पुढे गेली, तेव्हा हा माणूस अक्षरश: लोटांगण घालतात तसा जमिनीशी बिलगला आणि एका क्षणात उभा राहून तिथून निघूनही गेला. काही क्षणांमध्ये घडलेला हा सर्व प्रकार पाहताना हे जे काही घडलं ते नेमकं काय होतं, हाच प्रश्न राहून राहून विचारला जातोय.