मुंबई: चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकार चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करत आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. आजपासून राज्यभरात सुरु झालेल्या दूध बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, दुधाच्या दराबाबत आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही. त्यांच्या काळात दूध अर्थव्यवस्था ढासळली. भाजपने दूध भुकटी न्यूझीलंडमधून आयात केल्यामुळे दुधाचे भाव पडले होते. त्यामुळे आता भाजपने या मुद्द्यावरुन आंदोलन करणे हास्यास्पद असल्याचे थोरात यांनी म्हटले.
अमरावतीत दूध वाहतूक रोखली; सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली. तर अमरावती येथे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. या झोपलेल्या सरकारला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधींच्या घरातील दूध बंद करू असा इशारा माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला.
दूध बंद आंदोलनाला सुरुवात; सांगलीत आंदोलकांकडून गाड्या अडवून गरिबांना दुग्धवाटप
दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्यावतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.