ठाणे : कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे वाद होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना खाली उतरण्यास सांगितले जात आहे.
कल्याण, ठाण्यात बसमध्ये सातत्याने गर्दी दिसत आहे. कोरोनाचा कहर असताना बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अजिबात गंभीर नसल्याचा आरोप बेस्ट इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंदराव निकम यांनी केला आहे. याबाबत बेस्टच्या जनरल मॅनेजर यांच्याशी संवाद साधून काही मागण्या केल्याची माहिती निकम यांनी दिली आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा असल्याने कार्यरत असलेल्या बेस्टच्या १३७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ६५ जणांना ते कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडलं आहे, तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून बेस्टमधल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसह, उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी घरीच राहावे, अशा सूचना बेस्ट प्रशासनाने दिल्या आहेत.