गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : सावकारांकडून कर्जदारांचा जाच तसा नवा नाही. मात्र आता कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना ब्लॅकमेल करून लुटण्याचा नवा धंदा थाटलाय. कर्ज फेडल्यानंतरही पैसे उकळण्यासाठी मॉर्फिंगमाफियागिरीतून ग्राहकांना गंडा घालण्याचा संतापजनक प्रकार आता या कंपन्यांनी सुरू केलाय.
मात्र ही मॉर्फिंग माफियागिरी थेट आता ग्राहकांच्य़ा जीवावर उठू लागलाय. मुंबईतल्या मालाडमधले संदीप कोरगावकर हे अशाच एका कंपनीच्या जाळ्यात अडकले आणि जीव गमावून बसले.
संदीप यांना अनेक दिवसांपासून कर्ज घेण्यासाठी फोन येत होते. त्यांनाही गरज होती म्हणून त्यांनी थोडे पैसे घेतले. एका आठवड्यात त्यांनी ठरलेल्या व्याजासह रक्कम परतही केली. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांना फोन आला आणि कर्ज फिटलं नाहीये, अजून पैसे जमा करा असं सांगण्यात आलं.
कर्ज फेडलं नाही तर न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. याकडे संदीप यांनी दुर्लक्ष केल्यानंतर खरोखरच मॉर्फ केलेले त्यांचे न्यूड फोटो मित्र आणि नातलगांना पाठवण्यात आले.
हा अपमान सहन न झाल्यामुळे खचलेल्या संदीप यांनी आत्महत्या केली. कुरार पोलिसांनी याचा तपास सुरू केला आणि आणखी धक्कादायक माहिती समोर आली. एकूण पाच जणांना या लोन शार्क्सनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं आढळून आलंय. कर्ज देणाऱ्या अनोळखी अॅप्सच्या मायाजालात अडकू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
आधी आमिष दाखवून कर्ज द्यायचं आणि नंतर ब्लॅकमेल करून लूटमार करायची ही नवी सावकारी सुरू झाली आहे. यापासून तुम्ही सावध राहा. गरज असेल तेव्हा वैध मार्गानं आणि मान्यताप्राप्त कर्जदार संस्थेकडूनच कर्ज घ्या.