ganesh visarjan 2023 : दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होत आहे. विजर्सनासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या गणेशभक्तांना स्टिंग रे, जेलीफीश पासून सावधानता बाळगण्याचे आहावन मुंबई महापालिकेने केले आहे. विसर्जनासाठी मुंबई महापालिकेतर्फे खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विसर्जनस्थळी काय खबरदारी घ्यावी याबाबत महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत ( ).
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली होती.
या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश ‘डी’, ‘जी उत्तर’, ‘के पश्चिम’, ‘पी उत्तर’ आणि ‘आर मध्य’ या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.
मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाताना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.