अमित जोशी, झी २४ तास, मुंबई : सत्ता गेल्यानंतर भाजपच्या अडचणीत वाढ होताना बघायला मिळत आहे. एकीकडे खडसे यांचा पक्षाला घरचा आहेर, पंकजा मुंडे यांचे बंडाचे निशाण यानंतर आता भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारांची अस्वस्थता समोर येत आहे. निवडणुकीत डावललं गेलेल्या विनोद तावडे, एकनाथ खडसे त्यांच्यासह पंकजा मुंडे यांनी काही निर्णय घ्यावा अशी मागणी भाजप बंडखोर उमेदवारांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे, भाजपच्या या अपक्ष बंडखोर उमेदवारांची संख्या १० पेक्षा जास्त असून या उमेदवारांना जरी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले असले तरी त्यांनी मतं मात्र उल्लेखनीय मिळवली आहेत. सत्ता गेल्याने आणि महाविकास आघाडी सत्तेत आल्याने सर्व स्थानिक राजकारणाची समीकरणे उलटसुलट झालेली आहेत.
महाविकास आघाडीचा परिणाम हा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये होणार असल्याची भीती भाजपच्या अपक्ष बंडखोर उमेदवारांना आहे. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी पक्षाचे अस्तित्वच भविष्यात धोक्यात येणार असल्याची भीती या अपक्ष बंडखोर उमेदवारांनी भाजपच्या नेत्यांकडे व्यक्त केली आहे.