मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर भाजपने गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप असताना आणखी एक प्रकरण भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समोर आणलं आहे. एका मंत्र्याचा पीए म्हणवणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली असून या व्यक्तीने एक व्हिडिओ तयार केला आहे अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
प्रतीक काळे हा 27 वर्षीय तरुण गेले 6 वर्ष या सरकारमधील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या संस्थामध्ये काम करत होता. 30 ऑक्टोबरला त्याने आत्महत्या केली, त्याआधी त्याने एक व्हिडिओ क्लिप तयार केली आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रतीक काळेने दहा नावं घेतली असून त्यातल्या सात नावांची पोलिसांनी तक्रार घेतली. पण उरलेल्या तीन नावांवर पोलिसांनी मौन बाळगलं आहे.
या नावांमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचं आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही ही नाव असल्याचा गंभीर आरोपही केशव उपाध्ये यांनी केला आहे. जर राज्यातील एका मंत्र्यांचे नाव घेऊन कुणी आत्महत्या करत असेल तर हे गंभीर प्रकरण आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.,
या तरुणाला न्याय द्यायचा असेल तर शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यायला हवा, त्यांनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून काढून टाकावं, आणि जर सरकारने लक्ष दिले नाही तर आम्ही सीबीआयची मागणी करू असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. प्रतीक काळेवर आत्महत्या करण्याची वेळ का आली? या सर्व गोष्टी समोर यायला हव्यात अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली आहे.
दरम्यान केशव उपाध्ये यांनी केलेल्या आरोपांनंतर गडाख शंकरराव गडाख यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. प्रतिक काळेची बहिण प्रतिक्षा काळे यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीची प्रत मीडियामध्ये दिली असून या प्रकरणाचा शंकरराव गडाख यांचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या फिर्यादीत प्रतिक्षा काळे यांनी प्रतिकचे सात सीनिअर सहकारी त्याला त्रास देत असल्याचं म्हटलं आहे.
प्रतिक मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई इथं क्लार्क म्हणून नोकरीस होता, प्रतीक हा त्याचं काम इमानदारीने करत असल्याने तो गडाख कुटुंबियांच्या जवळ गेला होता, ते पाहून त्याच्या सात सीनिअर सहकाऱ्यांना ते आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून या ना त्या कारणावरुन प्रतिक याला त्रास देत होते. तू नोकरी करायची नाही, तू महाराष्ट्रातच थांबू नको अशी धमकी देऊन त्याला कोणाशी बोलू देत नव्हते. तसंत त्याने लावलेल्या खासगी खानावळीतही त्याला बंदी करण्यात आली होती. त्याच्याकडू जबरदस्तीने राजीनामाही लिहून घेण्यात आला होता, असा आरोप मृत प्रतिकच्या बहिणीने केला आहे.