मुंबई : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवसेनेच्या एका नेत्याच्या पत्नीला जी स्वतः नगरसेवक पदावर होती त्यांना अश्लील संदेश पाठवल्याबद्दल न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.
महिलेला 'गुडीया' असे मेसेजेसमध्ये संबोधण्यात आले आहे. महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत. महिला विवाहित आहे. आरोपीने मेसेजेस रात्री 11.30 ते 12.30 दरम्यान पाठवले होते. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी आयुष्याला बाधा आणणारे कोणतेही मेसेजेस पाठवण्याचा अधिकार कोणालाही नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
आरोपी नरसिंग गुडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ (महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याचा हेतू असलेला शब्द, हावभाव किंवा कृती) कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे), ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू झोपली आहेस का, तू विवाहित आहेस की नाहीस, तू हुशार दिसतेस, तू खूप गोरी आहेस, मला तू आवडतेस, माझे वय 40 वर्षे आहे, उद्या भेटू.” असे मेसेजेस आरोपीने या महिलेला पाठवलेले आहेत.
अज्ञात क्रमांकावरून काही अश्लील फोटो ही पाठवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेच्या पतीने अनोळखी नंबरवर कॉल केला असता ऑनलाईन गप्पा मारू असा मेसेज पुन्हा त्या महिलेला आला. त्यानंतर महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. महिला आणि तिचे पती दोघेही माजी नगरसेवक आहेत. तर आरोपी बीएमसी अधिकारी होता.
दाम्पत्य आणि अधिकारी यांच्यात वैयक्तिक वैर असल्यानेच एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला. मात्र दंडाधिकारी व्ही.जे.कोरे यांनी तो युक्तिवाद फेटाळून लावला.