मुंबई : कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मंगला एक्स्प्रेसच्या खोळंबामुळे बदलापूरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. तर हार्बर मार्गावर कुर्ला- टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद झाल्याने मुंबईहून पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. याचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर झाला. तब्बल २० ते ३० मिनिटांनी गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल झालेत. काहींनी चेंबूर येथून पायी जाणे पसंत केले.
मुंबईत पावसाचे आगमन झाल्यापासून मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाडांचे सत्रच सुरु आहे. शुक्रवारी दुपारी कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. इंजिन रुळावरुन घसरले. हे इंजिन रुळावरुन बाजुला करण्यात आले असून वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, गाड्या उशिराने धावत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिक- मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ओढा- नाशिकदरम्यान वाराणसी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या.