लोकल ट्रेन सुरू करण्याच्या चर्चेवर मध्य रेल्वेचा खुलासा

मुंबईत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.  

Updated: Jun 14, 2020, 10:30 AM IST
लोकल ट्रेन सुरू करण्याच्या चर्चेवर मध्य रेल्वेचा खुलासा title=

मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आतापर्यंत ५६ हजार ८३१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या माहामारीमुळे देशावर आर्थिक  संकट उभं राहिलं आहे. मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल सेवा  गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे पुन्हा मुंबईकरांची लाईफ लाईन  रूळावर कधी धावणार. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात येणार आहे. 

परंतु लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. 'उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहे. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळाले नाही.' अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. 

शिवाया या संबंधी कोणतेही निर्देश आम्हाला प्राप्त झाले तर कळवण्यात येईल असं देखील ते म्हणाले. दरम्यान मुंबई लोकलमधून जवळपास ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. परंतु कोरोना व्हायसरमुळे मुंबईकरांची लाईफ लाईन बंद आहे. ती मुंबईकरांच्या सेवेत पुन्हा कधी दाखल होईल हे सांगणे अद्याप कठीण आहे.