मुंबई : Uddhav Thackeray Criticized on Bjp : राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना, शिवसेना नेत्यांना त्रास दिला जात आहे. सत्ता मिळाली नाही म्हणून आता घरच्यांनाही सोडले जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणाच्या मागून कुटुंबीयांना त्रास देण्यात येत आहे. काय चाललंय तुमचं? तुमच्यात जर हिम्मत असेल तर मला टाका तुरुंगात. मी घाबरत नाही तुरुंगात जायला, असे थेट आव्हान मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिले. (Maharashtra Budget Session Chief Minister Uddhav Thackeray Criticized on Bjp)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. देशात सत्ता आली तरी काहींचा जीव मुंबईत दिसतो, असा जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्याचवेळी तर ईडी आहे की घरगडी आहे का, असे सांगत केंद्रीय तपास यंत्रणेवरही टीकास्त्र सोडले.
ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. ईडी आहे की घरगडी अशा शब्दात त्यांनी ईडीच्या कारवाईचा समाचार घेतला. सत्तेसाठी उगाचच कुणाचं नाव खराब करू नका, कुटुंबीयांची बदनामी कशासाठी? असा सवालही त्यांनी केलाय. हवे तर मला तुरूंगात टाका, शिवैनिकांची जबाबदारी मी घेतो असंही मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलंय. सत्तेच्या प्रयोगावरून त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावला.
कोविडकाळात झालेल्या भ्रष्टाचारावर फडणवीसांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. कोरोनामध्ये सर्व कामं ही टेंडर काढूनच केली गेल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. दरम्यान, सुपर मार्केटमध्ये मद्यविक्री करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र याबाबत निर्णय झाला असला तरी त्यावर हरकती मागवल्या आहेत. अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरुनही भाजपला घेरले. महाविकास आघाडी सरकारने चांगली कामे केली आहेत. ही कामे सांगण्याआधीच राज्यपालांनी अभिभाषण मध्येच सोडून गेले. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधाणिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे. मात्र, दाऊद कोठे राहतो, हे कोणालाच माहित नाही. त्याचा ठाव ठिकाणा माहिती नाही. केवळ आरोप करुन भ्रम निर्माण केला जात आहे. दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले. नवाब मलिक किती वेळा निवडून आलेत. त्यावेळी त्यांचा संबंध नव्हता का? आधी गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी जाहीर केले होते. दाऊदला फरफट आणू, पुढे काय झालं. आधी राम मंदिरचा मुद्दा होता. त्यावर मत मागितली निवडणुकीत आता दाऊद दिसतो का? असा प्रश्न करत काहीही आरोप करायचे हेच विरोधकांचे काम आहे. विकास कामांबाबत काय? राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे, याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.