कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील विसंवाद समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडेल. विशेष म्हणजे याच वेळेत उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. मात्र, शिवसेना आमदारांची बैठक पवारांच्या भेटीआधी किंवा नंतर होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
'कोरोनाची भीती असूनही फडणवीस रोज फिरतायंत, पण उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत'
कालच उद्धव ठाकरेयांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतली होती. यानंतर आज उद्धव यांनी सर्व आमदारांना पाचारण केल्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले आहेत. पक्ष संघटनेची बैठक असल्याने खासदार अनिल देसाईही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे कळते.
'त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकच्या फुशारक्या मारणारे आज राष्ट्रवादीकडे भीक मागतायत'
दरम्यान, आता सर्वांचे लक्ष हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीकडे लागले आहे. या आठवड्यातली शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली ही दुसरी भेट असेल. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्रालयाकडून केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. यानंतर महाविकासआघाडीत तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.