Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दीमुळं कित्येक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गर्दीमुळं जीव गमावलेल्या एका व्यक्तीच्या आई-वडिलांना 8 लाख रुपे नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर, कोर्टाने रेल्वेचा दावादेखील फेटाळला आहे. 8 मे 2010 रोजी गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोर्टाने प्रवाशांच्या आई-वडिलांना 4-4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नासिक अहमद खानकडे वडाळे ते सँडहर्स्ट रोड-चिंचपोकळीपर्यंतचा मासिक पास होता. तो नेहमी याच मार्गे प्रवास करायचा. 2010मध्ये एक दिवसी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तो घरातून निघाला. लोकलला त्यादिवशी खूप गर्दी होती. गर्दीमुळं लोकांचा एकमेकांना धक्का लागत होता. त्यातच नासिर ट्रेनमधून खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. प्रवाशांनी त्याला जेजे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रेल्वे न्यायधिकरणाने नासिरच्या आई-वडिलांचा दावा फेटाळून लावला होता. न्यायधिकरणाने एक प्रश्न उपस्थित केला होता, नासिर खरंच प्रवासी होता का आणि रेल्वे कायद्यानुसार ही घटना 'अयोग्य घटना' म्हणून पात्र आहे का, नासिरच्या अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल न देणे आणि जप्त केलेले रेल्वे तिकीट न मिळाल्याबद्दल न्यायाधिकरणाने शंका व्यक्त केली होती.
न्यायमूर्ती फिरदौस पूनीवाला यांनी चौकशीची पडताळणी केली. तसंच, मृत्यू प्रमाणपत्र, पंचनामा रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्टसह अनेक प्रमुख साक्षीदार आणि पुरावे तपासल्यानंतर नासिरचा खरंच ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता, असा निष्कर्ष काढला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, नासीरच्या शरीरावरील जखमा या चालत्या ट्रेनमधून पडल्याच्याच आहेत. त्यामुळं रेल्वे न्यायाधिकरणाचा दावा फेटाळण्यात आला आहे.
सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात ड्युटीवर तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्सटेबलने रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की सकाळी जवळपास 9.45 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता आणि त्याला इतर प्रवासी टॅक्सीतून रुग्णालयात नेले होते. ते लगेचच रुग्णालयात पोहोचले आणि तिथल्या डॉक्टरांसोबत चर्चा केली.
नासिरच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकार केली होती. त्यात म्हटलं होतं की, नासिर दररोज ट्रेनने प्रवास करायचा त्याच्याकडे मासिक पासदेखील होता. त्याव्यतिरिक्त नासिर हा एकटाच त्याच्या आई-वडिलांचा आधार होता. कोर्टाने आदेश दिले आहेत की, रेल्वेने त्याच्या आई-वडिलांना चार-चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर नुकसानभरपाई देण्यासाठी 8 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर 7 टक्के अतिरिक्त व्याजदेखील देण्यात यावा.