Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोठा खुलासा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी असलेल्या विष्णू चाटेचा मोबाईल सापडलेला नसल्याने तपासात अडचणी येत असतानाच सीआयडीने या प्रकरणाच्या तपासासाठी दुसरा मार्ग निवडला आहे. विष्णू चाटे संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाध्ये खंडणी घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. मात्र त्याचा मोबाईल पोलिसांना सापडलेला नाही. म्हणूनच तपासात अडथळे येत असून यावर मात करण्यासाठी आता विष्णू चाटेचे व्हॉईस सॅम्पल सीआयडीने घेतले आहेत. या व्हॉईस सॅम्पलमधून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळेच तपास प्रक्रियेत मदत होण्यासाठी आता विष्णू चाटेचे काही व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले आहेत. केवळ विष्णू चाटेच नाही तर या प्रकरणामधील अन्य एक आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचेही व्हॉईस सॅम्पल घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विष्णू चाटेने पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याचसंदर्भात त्याचा व्हॉईस सॅम्पल घेण्यात आला आहे. विष्णू चाटेचे हे व्हॉईस सॅम्पल बुधवारी म्हणजेच 8 जानेवारी रोजी सीआयडीकडून घेण्यात आले असून आता त्यांची पडताळणी केली जाणार आहे. विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप सापडलेला नसला तरी इतर तांत्रिक पुराव्यांचा विचार केल्यास हे व्हॉईस सॅम्पल महत्त्वाचे ठरणार आहेत. या व्हॉईस सॅम्पलमधून आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागण्यात आली होती? आरोपी आणि पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांमध्ये नेमके काय बोलणे झाले? याचा उलगडा होऊ शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती देतानाही खंडणी मागण्यात आली होती असा उल्लेख केला आहे. त्यामुळेच आता या प्रकरणा नेमकी कोणाकडे आणि किती खंडणी मागण्यात आलेली हे व्हॉईस सॅम्पलच्या माध्यमातून उघड होण्यास मदत होणार आहे.
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर खंडणीप्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा उल्लेख केला. धस यांच्या दाव्यानुसार खंडणीसंदर्भात बोलणी करण्याची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी झाली. धस यांनी आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा संदर्भ देत लवकरच त्याबद्दल खुलासा करणार असल्याचंही म्हटलं आहे.