आशिष उदास, मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या (रविवारी) दुसरी वन-डे मॅच रंगणार आहे. रविवारी दुपारी 12.30 वाजता कटकच्या बाराबाटी स्टेडियमवर हा मुकाबला रंगणार आहे. नागपूर वन-डेमध्ये टीम इंडियानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत करत 3 वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कटकची वन-डे मॅच जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे इंग्लंडला पहिल्या वन-डेतील पराभव विसरुन नव्या दमानं टीम इंडियाच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे.
नागपूर वन-डेमध्ये शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्सर पटेलनं हाफ सेंच्युरी खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये हार्षित राणा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 3 विकेट्स घेत इंग्लंडला जखडून ठेवलं होतं. पण कॅप्टन रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते.
हे ही वाचा: पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे 'हे' 7 क्रिकेटपटू नव्हते मुस्लिम, एकाने स्वीकारला होता इस्लाम धर्म
टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली पहिल्या वन-डेला मुकला होता, त्यामुळे उद्याच्या वन-डेसाठी टीम इंडियात त्याला संधी मिळते का ते महत्त्वाचं ठरणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे.
हे ही वाचा: 'हा' भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट!
दुसरीकडे इंग्लंडच्या ताफ्यात मॅच विनिंग इनिंग देणारे खेळाडू आहेत पण कॅप्टन जॉस बटलरच टीम इंडियाचा खंबीरपणे मुकाबला करत आहे. पहिल्या वन-डेत फिल सॉल्ट आणि बेन डकेटनं आक्रमक सुरुवात केली पण मोठी धावसंख्या उभी करण्यात ते अपयशी ठरलेत. ज्यो रुट टीम इंडियाच्या बॉलर्सचा संघर्ष करताना दिसला. बॉलिंगमध्ये इंग्लंडला पाहिजे तशी भरीव कामगिरी करता आली नाही.. एकंदर टीम इंडिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंवर नजर टाकली तर टीम इंडियाचं पारडं नक्कील जड दिसंतय. एकंदर कटकमधील दुसरी वन-डे मॅच जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाच्या शिलेदारांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे इंग्लंडसाठी ही वन-डे मॅच करो या मरो सारखी आहे.