मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांनी कलम १८८चे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दुपारपर्यंतच्या काळात १०३७ नवीन गुन्हे दाखल करण्यात आलेआहेत. आतापर्यंत एकूण ७३ हजार ७३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
देशात कोरोनाचे संकट असल्याकारणाने २२ मार्चपासून लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले. राज्यातही लॉकडाऊन सुरु आहे. या काळात कोरोना विषाणूच्यासंदर्भात लागू केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने कारवाई केली आहे. सोमवारपर्यंत कोविड १९ च्या अनुषंगाने पोलिसांच्या १०० क्रमांकावर ७८ हजार ४७४ एवढ्या तक्रारी आल्या होत्या. क्वारंटाईनचे उल्लघंन केल्याप्रकरणी ६१० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना च्या विरुद्ध रामबाण उपाय लॉकडाउन आहे. तातडीची गरज असेल तर बाहेर जाताना सबळ कारण आपल्याकडे असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवा. पोलीसांनी विचारल्यास त्यांना दाखवा.
"रस्त्यावर उभा आहोत सुरक्षित मुंबईसाठी... तुमचा त्रास कमी करण्यासाठी..."#घरी_रहा_सुरक्षित_रहा
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 27, 2020
दरम्यान, काल नाशिकमधील मालेगावात पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता याठइकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर गेल्या चोवीस तासात अवैध वाहतुकीची नवीन आठ प्रकरणे दाखल झाली असून आतापर्यंत त्यांची संख्या ११०० झाली आहे. नव्या आठ प्रकरणात नव्या ४११ जणांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत ४८ हजार १७७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर २ कोटी ७८ लाख ६४ हजार २९४ रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.