Corona : हातावर शिक्का असलेल्या दोघांना विरार स्टेशनवर उतरवलं

देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Updated: Mar 21, 2020, 05:50 PM IST
Corona : हातावर शिक्का असलेल्या दोघांना विरार स्टेशनवर उतरवलं title=

विरार : देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २९४ वर गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ६३ रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या काही तासांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ११नी वाढला आहे. या नव्या रुग्णांपैकी १० जण मुंबईचे तर १ जण पुण्याचा आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वारंवार काळजी घेण्याचं आणि घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण काही नागरिकांकडून या आवाहनाला केराची टोपली दाखवली जात आहे. 

विरार रेल्वे स्टेशनवर होम क्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या दोघांना उतरवण्यात आलं आहे. हे दोन्ही प्रवासी इंटरसिटी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. यातल्या एक महिला आणि एका पुरुषाच्या हातावर शिक्के होते. वांद्रे येथून गुजरातला जाण्यासाठी हे दोघं वेगवेगळ्या डब्यात बसले होते. हे दोघंही दुबईवरुन परत आले आहेत. विरार स्टेशनवर उतरवण्यात आलेली महिला बोरिवलीवरुन बडोद्याला जात होती, तर दुसरा व्यक्ती बोरिवलीवरुन सुरतला चालला होता. 

दुसरीकडे कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या चौघांनी १६ मार्चला गोदान एक्स्प्रेसमधून मुंबई ते जबलपूर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कालच या चौघांचे कोरोनाचे रिपोर्ट आले आहेत. गोदान एक्स्प्रेसच्या B-1 कोचमधून या चौघांनी प्रवास केला. मागच्याच आठवड्यात हे चौघं दुबईवरून भारतात परतले होते.

संबंधितांना याप्रकरणी अलर्ट करण्यात आल्याचं ट्विट रेल्वेने केलं आहे. या चौघांसोबत त्या बोगीमध्ये नेमकं कोण होतं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.