मोठी बातमी: हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी

प्राथमिक माहितीनुसार, हिंदुजा रुग्णालयातील १०० कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Updated: Mar 13, 2020, 08:55 AM IST
मोठी बातमी: हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण मुंबईत सापडला आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयातील व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, हिंदुजा रुग्णालयातील १०० कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आज दुपारपर्यंत या सर्वांचे रिपोर्ट येणार असल्याचे कळते. हे रिपोर्ट येईपर्यंत संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना हिंदुजा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर ठाण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण घोडबंदर परिसरात राहणार आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

दरम्यान, काल दिवसभरात कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ संशयित रुग्ण दाखल झाले. या सर्वांचे अहवालही आजच मिळणार आहेत. महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. 

भारतामध्ये कोरोनाचा पहिला बळी

करोनाने आतापर्यंत जगभरात ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,२५,२९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आणखी खबरदारीची पावले उचलली आहेत. दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.