मुंबई : आज सारथीच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीराजे यांना सभागृहात खाली तिसऱ्या रांगेत बसवण्यात आल्याने मराठा समन्वयक आक्रमक झाले. संभाजीराजे यांना व्यासपीठावर स्थान दिलं गेलं पाहिजे होतं अशी त्यांनी मागणी होती. त्यानंतर उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या दालनात दुसरी बैठक झाली. त्या ठिकाणी मात्र अजित पवारांच्या बाजुला संभाजीराजे बसले होते. बैठक झाल्यानंतर संभाजीराजेंना बोलू दिलं नाही, बैठक मध्येच संपवली असा आरोप धनंजय जाधव यांनी केला.
धनंजय जाधव यांनी म्हटलं की, 'सारथीचा अहवाल प्रकाशित केला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजितदादांना पूर्वीच्या समितीचा अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले. पण दादांनी म्हटलं की तो अहवाल नाही आता दुसरा अहवाल येतोय. पहिल्या अहवालात काही चुकीच्या गोष्टी असतील ते ओपन करा. वडेट्टीवार म्हणाले होते की, पूर्वीच्या अहवालावर आमचेच काही मंत्री नाखूश आहेत. म्हणजे यांच्यातच गोंधळ आहे. समाजाला दावणीला बांधण्याचं काम करत आहेत. काही जणांनी मत मांडली. काही जणांचं बोलणं बाकी होतं. त्यानंतर संभाजीराजे बोलणार होते. पण त्याआधीच अजितदादांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे बैठक विस्कळीत झाली.'
'सारथी संदर्भातील अनेक गोष्टी अजून अंधातरीत आहेत. ओपन बैठकीत अजितदादांनी सांगितलं पाहिजे होतं की, सारथीच्या बाबतीत त्यांनी काय काय पुढाकार घेतला आहे.'
'संभाजीराजे यांना समाज वेगळ्या नजरेने पाहतो. पण त्यांना पूर्वीच्या बैठकीत ही अशीच वागणूक दिली आणि आजच्या बैठकीत ही असंच झालं. यापुढे भविष्यात संभाजीराजे मला नाही वाटत कुठल्या गोष्टीमध्ये आता हस्तक्षेप करतील. छत्रपत्री संभाजीराजेंना विश्वास देणारे शब्द पाळत नाही असा आरोप देखील धनंजय जाधव यांनी यावेळी केला आहे.