दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : खमंग फराळाशिवाय दिवाळी पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे घराघरात फराळाची तयारी सुरू आहे. बाजारात देखील मराठमोळा फराळ सातासमुद्रापार पाठवला जात आहे. चिवडा...लाडू...चकल्या...शंकरपाळी...करंजी...फराळाची अशी खमंग मेजवानी परदेशातल्या भारतीयाला कायमच हवीहवीशी वाटते.
त्यामुळेच दिवाळीला मुंबईतून जगभरातल्या तब्बल १७६ देशांमध्ये फराळ पोहोचवला जातो. साधारण सप्टेंबरपासूनच अशा ऑर्डर्स स्वीकारल्या जातात. आणि दिवाळी आली की हा फराळ अमेरिका, लंडन, दुबई, फ्रांस अशा विविध देशात पोहोचवला जातो.
तेलकट, तुपकट फराळ खायची प्रचंड इच्छा असली तरी वजन तर वाढणार नाही ना? याचीही काळजी हल्ली सगळ्यांनाच सतावत असते. म्हणूनच डाएट फराळ हा नवा प्रकार आता बाजारात आला आहे.
चकली, चिवडा, शेव, शंकरपाळी प्रत्येकी ५०० रुपये किलो असा दर भारतात तर परदेशात पाठवण्यासाठी चौदाशे रुपये किलो असा दर आकारला जातो. एक बेसन लाडू, १ करंजी, १ अनारसा भारतात ३० रुपये दरानं तर परदेशात ७० रुपये दरानं विक्री केली जाते.
दिवाळी आल्यानं बाजारात काही प्रमाणात तेजी आली असून व्यापाराला अच्छे दिन येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.