प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, भाईंदर : भाईंदरमध्ये राहणारे डॉक्टर उदय मोदी. पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर पण अख्ख्या भाईंदर परिसरात त्यांची ओळख श्रावणबाळ अशीच आहे. त्यांचा डॉक्टरकीचा व्यवसाय आहे.. तो सांभाळून ते मीरारोड भाईंदर परिसरात राहणा-या निराधार वृद्धांना डबा पुरवतात... विशेष म्हणजे या डब्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जात नाही.... ज्या वृद्धांची उतारवयात देखभाल करणारं कुणीच नाही, अशा वृद्धांच्या घरी रोज हा डबा पोहोचता होतो....
डॉक्टर मोदी यांना ११ वर्षांपूर्वी एक आजोबा भेटले. त्यांची व्यथा ऐकताच अशा वृद्धांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय डॉक्टर मोदींनी घेतला. तेव्हापासून त्यांची ही टिफीन सर्विस सुरू झाली. सुरुवातीला फक्त अकरा जोडप्यांना डबा पुरवला जायचा आता ही संख्या 200 झालीय. सकाळी जेवण तयार केलं जातं... त्याची चव बघितल्यानंतरच घरोघरी डबे रवाना होतात. विशेष म्हणजे प्रत्येक घरातल्या वृद्ध व्यक्तींच्या पथ्थ्यानुसार वेगवेगळे डबे जातात. त्यासाठी डॉक्टर उदय मोदी जातीनं लक्ष देतात.
या कामात टेम्पो आणि सायकलवाल्याची मदत घेतली जाते. गरजू वृद्धांपर्यंत हे डबे पोहोचले की आपोआपच या डॉक्टरांसाठी आशीर्वाद बाहेर पडतात...
डॉक्टर उदय मोदी हे टीव्ही मालिकांमधून कामही करतात. त्यातून मिळालेलं उत्पन्न ते समाजसेवेसाठी देतात. गेल्या अकरा वर्षांपासून त्यांची ही अविरत सेवा सुरू आहे.. त्यात तुम्हीही थोडासा खारीचा वाटा उचललात तर निश्चितच मदत होणार आहे.